मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हा राज्यात अग्रभागी ठेवूया– पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा हा डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला जिल्हा आहे. लोकांच्या कल्याणांच्या योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहचल्या पाहिजेत. सार्वजनिक हिताची कामे नेटाने व पद्धतशीर झाली पाहिजेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविले जावे, यासाठी सर्व सरपंच, ग्रामसेवक व सदस्य, सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी झोकून देवून काम करावे. या अभियानाबद्दल घराघरात जावून जागृती करावी व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधून सक्षम नेतृत्व तयार होत असते. लोकनेते बाळासाहेब देसाई हे देखील 11 वर्ष लोकल बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळत होते. पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मर्यादित निधी येत होता, त्या तुलनेत आता या संस्थांना स्वायत्तता आली आहे. त्यांच्याकडे येणारा निधी दूरदृष्टीने खर्च केला पाहिजे. सातारा जिल्हा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच अनेक चळवळी यशस्वी करणारा, राज्याला, देशाला नेतृत्व देणारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील आदर्श शाळा माझी शाळा, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपक्रम अत्यंत यशस्वी करुन सातारा जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानही यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अपार मेहनत घेऊया, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत, नगर पालिका व शहरे ही स्वच्छ असावी सातारा जिल्हा सुंदर जिल्हा करावा यासाठी गुडमॉर्निग पथकाप्रमाणे पथके तयार करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यशाळेप्रसंगी दिल्या.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. गोरे म्हणाले, गावागावात चळवळ उभी राहिल्याशिवाय परिवर्तन होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामविकासाची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करुया. सातारा जिल्ह्याला चळवळीला मोठा इतिहास आहे, स्वराज्याची चळवळही याच मातीतून उभी राहिली. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही चळवळी यशस्वी करण्यासाठी जिल्हा वासियांनो सज्ज व्हा. शासन आपल्या पाठीशी आहे, असे सांगून हे अभियान म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व सिद्ध करणारी स्पर्धा आहे.
आपली गाव, खेडी मजबूत व समृद्ध झाली पाहिजेत त्याचवेळी आपल्या गावाबद्दची जबाबदारी समजली पाहिजे. विकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची येत्या १७ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाकडे मोठी यंत्रणा असून विभागाने ठरविल्यास हे अभियान घराघरात पोहोचेल. सरपंच, अधिकाऱ्यांनी हे अभियान आपले आहे या भूमिकेतून काम करावे. महिला बचत गट, तरुण मंडळे, नेहरू युवा मंडळे, माजी विद्यार्थी संघटना, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गणेश मंडळे, वृक्षप्रेमी संघटना आदी सर्वांना या अभियानाच्या प्रारंभी निमंत्रित करुन त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
देशाच्या इतिहासातील ग्रामविकासाची मोठी चळवळ उभी करायची आहे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, समृद्ध गाव बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री यांचा असून त्यासाठी हे अभियान तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात २० गावे निवडण्यात येणार आहे. १ हजार ९२० गावांना बक्षीस देण्यात येईल. चांगले काम करणारी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना बक्षीस देण्यात येणार आहे. समृद्ध महाराष्ट्रासाठी सक्षम पंचायत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियानात ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी यासाठी या अभियानात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. १०० टक्के घरकुलांचा लाभ देणारे गाव, १०० टक्के आयुष्मान भारत कार्ड देणारे गाव, स्मशानभूमी आदी कामे करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, राज्यात 50 टक्के नागरिकरण झाले असले तरी सातारा जिल्ह्यातील 80 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास झाल्याशिवाय जिल्ह्याचा संपूर्ण विकास कामे होत नाहीत. बिदालने वॉटरकप मध्ये केलेली कामगिरी मान्याचीवाडी सौर ऊर्जा ग्राम म्हणून राज्यात गौरविले अशा विविध संकल्पना जन्म देणारी व यशस्वी करणारी ही सातारची भूमी आहे. लोकप्रतिनिधी, युवक, ग्रामस्थ या सर्वांनी एकदिलाने प्रयत्न म्हणून या संकल्पना यशस्वी झाल्या. आजच्या कार्यशाळेचा मुलमंत्र हाच असणार आहे. सर्वांना सोबत घेऊन हे अभियान आपण राबवूनया. निश्चितच आपण राज्यात अग्रभागी राहू, असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राष्ट्रीयस्तरावर आपल्या कामाचा डंका वाजविला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करायचे आहे. आपण ग्रामपंचायतस्तरावर अनेक सेवा देत असतो. त्याची व्यवस्थीत नोंद ठेवणे, तीन महिन्यात वसुली करुन विहित पद्धतीने खर्च करणे, विविध आवास योजना, बचत गट, शाळा, अंगणवाडी यांचे सक्षमीकरण, पाणी पुरवठा योजना सक्षमीकरण आदी सर्व लोक कल्याणाच्या योजनांचा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. यासाठी सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक संस्था अन्य प्रशासकीय यंत्रणा, नागरिक या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. ग्रामविकास मंत्री यांचा जिल्हा असल्याने हा जिल्हा अग्रभागी ठेवूया.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भातील घडी पुस्तिकेचे प्रकाशन व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी विविध गावचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.













