जावलीच्या दारूबंदीचं नेमकं कुणाला विचारू? सरकारी दवाखान्यातच दारू?
जावली प्रतिनिधी; उभी बाटली आडवी करून दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय झाला होता.
या निर्णयानंतर अनेक वर्ष दारूबंदी होती. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी या परिसरात आडवी बाटली उभी केली होती. त्यालाच अनुसरून 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री साताऱ्याचे असल्याने अनेकांना मद्यविक्री ची भुरळ पडली होती की काय? त्यामुळेच कुडाळ मध्ये ऐतिहासिक दारूबंदीला छेद देत मद्य विक्री सुरू करण्यासाठी स्थानिक नेते, व्यापारी, व्यावसायिक यांच्यामार्फत बैठक घेऊन, दारूबंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती.
शासकीय उपक्रमांद्वारे दारू बंदी, व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवले जातात. परंतु जावली शासकीय रुग्णालयच तळीरामांचा अड्डा झाला आहे की काय? असेच चित्र दिसू लागले आहे. चक्क शासकीय रुग्णालयातील फ्रिजमध्ये दारूच्या बाटल्या ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहमी लोकांना दारूबंदी व्यसनमुक्तीचे शिक्षण देणारे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय कर्मचारी, हेच व्यसनाधीन असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दारूबंदी असलेल्या परिसरात दारू आणून विक्री केली जात तर नाही ना? असा सवाल अनेकांच्या मनात येत आहे. शीतपेटीमध्ये दारू ठेवून रुग्णालयात कोणता उपचार केला जातो हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
दारूबंदी असलेल्या परिसरात दारू आणणे आणि ती विकणे कायद्याने गुन्हा आहे. आणि हा गुन्हा शासकीय कर्मचारीच करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. सोबतच रुग्णालयातील नियम व अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. सोबतच रुग्णालयात असणाऱ्या रक्ताचे नमुने, औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शीतपेटीचा गैरवापर अधिकारी कर्मचारी करीत असल्याने सातारा जिल्हा शल्यचिकित्सक नेमकी काय कारवाई करणार? हे मात्र गुलदस्त्यात आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याचा राजीनामा सातारा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुपूर्त केला आहे. अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने प्रकरणाच्या चौकशीला पूर्णविराम मिळाला आहे का? हे प्रकरण अधिकाऱ्यांनी दाबले आहे का? फेब्रुवारीतील या प्रकरणाची कुठेही चर्चा का नाही? असा सवाल अनेकांना पडलाय.













