श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 चे भुमि पुजन संपन्न
फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण अंतर्गत दिनांक 2 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 च्या ग्राऊंडचे भुमि पुजन समारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. नितीन गांधी, डॉ. पी. सी. पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील क्रिडा मैदानावर संपन्न झाला. कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कृषि क्षेत्राशी निगडित 200 हून अधिक कृषि निविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषि प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषि उद्योजकता विकास, दुग्ध व्यवसाय इत्यादी. भुमि पूजन समारंभ प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटणचे प्राचार्य श्री. एस. आर. वेदपाठक, पद्मभूषण डॉ. सुखात्मे कृषि तंत्र निकेतन, फलटणचे प्राचार्य श्री. जे. एस. माने, पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. इंगवले, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.










