राष्ट्रीय महामार्गालगतच्या अर्धवट नाली बांधकामामुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे
वनसडी ग्रामपंचायतीमार्फत राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेले नालीचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडीचे तालुका महामंत्री तिरुपती कन्नाके यांच्या घरासमोर नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी व कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्गालगत नालीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र हे काम तिरुपती कन्नाके यांच्या घरापर्यंत येऊन थांबले असून पुढील बांधकाम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाचे पाणी, सांडपाणी व कचरा वाहून येऊन त्यांच्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात तिरुपती कन्नाके (आदिवासी आघाडी तालुका महामंत्री, भाजप-कोरपना) यांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन सादर करून नालीचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करावे तसेच गावातील सांडपाण्याचा योग्य निचरा करून ते गावाबाहेर सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
मात्र निवेदन देऊनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप कन्नाके यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक असताना संबंधित प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नालीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.












