सातारा जिल्हा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा प्रवेश; पोलिसांनी महिलेसह दोघांना घेतले ताब्यात!
गळ्यात भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, अधिकाऱ्यांसोबत चहापान अन् मतदान केंद्रांवर रुबाब; पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
दहिवडी | प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीदरम्यान माण तालुक्यातील दहिवडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र गळ्यात घालून आपण निवडणूक निरीक्षक अधिकारी असल्याचा आव आणत विविध मतदान केंद्रांवर फिरणाऱ्या एका संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेसह अन्य दोघांनाही सातारा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नेमका प्रकार काय?
रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांकावर वर्षाली अक्षद देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) ही महिला गळ्यात भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र घालून दाखल झाली. आपण निवडणूक निरीक्षक अधिकारी असल्याचे सांगत तिने थेट मतदान केंद्रात प्रवेश केला.
विशेष म्हणजे, संबंधित महिला केवळ दहिवडीपुरती मर्यादित नव्हती, तर विविध मतदान केंद्रांवर जाऊन निरीक्षक असल्याचा आव आणत असल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रांवर तिचा वावर, अधिकाऱ्यांसोबतची उठबस आणि चहापानाच्या चर्चांमुळे सुरुवातीला कोणालाही संशय आला नसल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना आला संशय अन् ओळखपत्राची पडताळणी!
मात्र, पोलीस अधिकारी राजश्री प्रेरणे आणि पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांना तिच्या ओळखीबाबत संशय आला. त्यांनी तातडीने तिच्या ओळखपत्राची पडताळणी केली असता, ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अधिकृत निरीक्षक नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ओळखपत्र तिने २०२३ मध्ये पुण्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम करत असताना तयार करून घेतले होते. त्या ओळखपत्रावर पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील Electoral Registration Officer असा उल्लेख होता.
अनेक प्रश्न उपस्थित; तपासातून काय बाहेर येणार?
या घटनेमुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित महिला नेमकी कोणत्या उद्देशाने मतदान केंद्रांवर फिरत होती? तिने किती मतदान केंद्रांना भेटी दिल्या? तिच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग होता? अधिकृत नियुक्ती नसताना तिला मतदान केंद्रांमध्ये प्रवेश कसा मिळाला?
असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कडक पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असतानाही एखादी संशयित व्यक्ती निवडणूक निरीक्षक असल्याचा आव आणून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचते, ही बाब तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, या प्रकारामागील नेमके कारण आणि आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या ओळखपत्र पडताळणी आणि मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
संपादक : विजय भिसे
एव्हीबी माझा













