🛑 एव्हीबी माझा | विशेष बातमी
वाठार निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सोसायटीत नंदुशेठ नाळे यांचे वर्चस्व कायम!
जिल्हा बँक ठरावात सुवर्णा नंदुशेठ नाळे यांना ९ मते; राजे गटाला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का
फलटण | प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधून जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक सोसायटीतील ठरावाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, त्यातून आगामी जिल्हा बँक निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
अशातच वाठार निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड येथे झालेल्या ठरावाच्या बैठकीत नंदुशेठ नाळे यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, या निकालामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सोसायटीच्या एकूण १३ संचालकांपैकी १२ संचालक उपस्थित होते, तर एक संचालक गैरहजर होता. जिल्हा बँकेच्या ठरावासाठी राजे गटाकडून अशोक निंबाळकर, तर खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाकडून सौ. सुवर्णा नंदुशेठ नाळे यांचे नाव पुढे करण्यात आले.
यानंतर झालेल्या मतदानात सौ. सुवर्णा नंदुशेठ नाळे यांना तब्बल ९ मते मिळाली, तर अशोक निंबाळकर यांना केवळ ३ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे बहुमताने सौ. सुवर्णा नंदुशेठ नाळे यांच्या नावाचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा ठराव मंजूर करण्यात आला.
या निकालामुळे वाठार निंबाळकर सोसायटीवर नंदुशेठ नाळे यांचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, त्यांच्या नेतृत्वाला संचालक मंडळाने बहुमताने पाठिंबा दिल्याचे दिसून आले.
राजे गटासाठी धोक्याची घंटा?
फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये या निकालाला विशेष महत्त्व दिले जात आहे. सातारा जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून प्रभाव असलेल्या आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटाला यावेळी तालुक्यातील काही महत्त्वाच्या सोसायट्यांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे धुळदेव, दालवडी आणि आता वाठार निंबाळकर या महत्त्वाच्या सोसायट्यांचे जिल्हा बँकेचे ठराव राजे गटाच्या विरोधात गेल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीत फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाची ताकद वाढली?
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यातील विविध सोसायट्यांमध्ये संपर्क वाढवून संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. वाठार निंबाळकर येथील निकालामुळे त्यांच्या गटाला मोठे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत आणखी अनेक सोसायट्यांचे ठराव होणार असल्याने फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत कोणता गट जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
⸻
✍️ विजय भिसे
संपादक – एव्हीबी माझा













