बारामती शहर पोलीसांची कारवाई : नामांकित कंपनीच्या डिझाईनची नक्कल करून विक्रीसाठी ठेवलेला 82,600/- रुपये किंमतीचा संशयित बनावट माल जप्त

बारामती शहर पोलीसांची कारवाई : नामांकित कंपनीच्या डिझाईनची नक्कल करून विक्रीसाठी ठेवलेला 82,600/- रुपये किंमतीचा संशयित बनावट माल जप्त

बारामती प्रतिनिधी

दिनांक 02/06/2026 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करून नामांकित कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल केल्याचा संशय असलेला माल विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी बारामती शहर पोलीसांनी यशस्वी छापा कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रा. लि., चंदीगड (पंजाब) येथे फिल्ड एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी श्री. सरफराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी SAINT-GOBAIN INDIA PRIVATE LIMITED कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल करून पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांची निर्मिती व विक्री होत असल्याबाबत माहिती बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती.

सदर माहितीच्या आधारे बारामती शहर पोलीस स्टेशनकडून देशमुख वस्ती, पाटस रोड, बारामती येथील समीर एंटरप्राईजेस या दुकानावर पंचांच्या उपस्थितीत छापा कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दुकानाची पाहणी केली असता SAINT-GOBAIN INDIA PRIVATE LIMITED कंपनीच्या मूळ उत्पादनाच्या डिझाईनशी साधर्म्य असलेल्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला.

सदर ठिकाणाहून 12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचे एकूण 59 बंडल (1180 नग) जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 82,600/- इतकी असून पंचासमक्ष नमुने वेगळे काढून उर्वरित मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करून सीलबंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी दुकान मालक शरफुद्दीन सैपूल्लाह कुरेशी, वय 38 वर्षे, रा. रेणुका नगर, फलटण रोड, बारामती याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 अन्वये प्रतीलिपी अधिकार अधिनियम, 1957 चे कलम 51, 63 व 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासामध्ये जप्त करण्यात आलेल्या मालाचा उगम, उत्पादन साखळी, पुरवठादार, विक्री व्यवहार, संबंधित ग्राहक, उत्पादनासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री, आर्थिक व्यवहार तसेच आवश्यक परवानग्या याबाबत सखोल तपास सुरू असून जप्त मालाबाबत संबंधित कंपनीकडून तांत्रिक व कायदेशीर अभिप्राय प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.

बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन, बनावट उत्पादनांची निर्मिती व विक्री तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद उत्पादनांबाबत माहिती असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलीसांनी केले आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तथा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय जाधव, पोलीस शिपाई अक्षय सिताफ व शासकीय वाहनचालक पोलीस शिपाई श्री. ऋषिकेश जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे हे करीत आहेत. 

प्रतिनिधी — सिकंदर शेख 

     बारामती

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें