प्रतिनिधी: सचिन देवरे | नाशिक
नाशिकमधून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बाब समोर आली आहे…
गावोगावी वाढत चाललेल्या भोंदू बाबांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. “गावोगावी लबाड भोंदूबाबांना गावबंदी करा” अशी ठाम भूमिका नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी मांडली आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची धडक टीम नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. यावेळी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्या देशभरात चर्चेत असलेल्या भोंदू बाबांच्या प्रकरणातून धडा घेत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र एस.आय.टी. (Special Investigation Team) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीच्या मते, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी जनजागृतीसोबतच कडक कायदे आणि अंमलबजावणी आवश्यक आहे.
यावेळी अमोलभाऊ भागवत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देत, लोकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली.
दरम्यान, या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार का, आणि राज्य सरकार याबाबत कोणते निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…









