लोणंद येथे मोठी कारवाई : ३ देशी पिस्तुले व मुद्देमालासह पाच जण ताब्यात
लोणंद | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी लोणंद परिसरात मोठी कारवाई करत अवैध शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ देशी बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे, १ मारुती सुझुकी इर्टिगा कार आणि ६ मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे ₹१२,६७,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लोणंद बसस्थानक परिसरात काही इसम अवैध शस्त्रास्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची ३ पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारित) २०१९ च्या कलम ३, ७ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.













