अंत्यविधीसाठी जात असलेल्या श्री.अशोक राजपूत यांना डंपरचालकाने चिरडले.
*साक्री ( धुळे ) १५ फेब्रुवारी*: (साक्री प्रतिनिधी विलासराव पाटील.)
आज सकाळी १०.०० वाजता कासारे फाट्यावरील हॉटेल प्रगती जवळ चहा पाण्यासाठी थांबलेल्या रायतेल तालुका साक्री येथील श्री अशोक राजपूत (वय ५५) यांना डंपरने चिरडले. श्री अशोक राजपूत हे उभ्या मोटरसायकलवर एक पाय ठेवून बसून तंबाखू खात होते, त्यावेळी विजापूरकडून येणाऱ्या भरधाव डंपर चालकाने शॉर्टकट मारण्याच्या नादात त्यांना चिरडले असून मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला. डंपरचा ड्रायव्हर फरार आहे. श्री अशोक राजपूत हे दहिवेल कडून येऊन गणेशपुरला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते त्यावेळी हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनची गाडी त्वरित तेथे हजर झाली व मयताला खाजगी गाडीतून साक्रीकडे रवाना केले.यावेळी साक्री पोलिस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक श्री.दीपक वळवी स्वतः हजर होते. इतर अधिकाऱ्यांमध्ये
पोलीस उपनिरीक्षक श्री .प्रसाद रौंदळ ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री.राजू जाधव हेड कॉन्स्टेबल श्री .संतोष मोरे,पोलीस कॉन्स्टेबल श्री. निखिल काकडे व श्री.मंगेश खैरनार इ. हजर होते. पुढील तपास ग्रेड उपनिरीक्षक श्री राजू जाधव हे करीत आहेत.
श्री अशोक श्याम सिंग राजपूत वय 55 राहणार रायतेल हे सकाळी गणेशपुरला त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी चालले होते. त्यावेळी ते कासारे फाटा येथे थोड्यावेळ थांबले त्यानंतर उभ्या मोटरसायकलवर एक पाय ठेवून ते तंबाखू चोळत असताना विजापूर कडून खडी घेऊन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जागेवर चिरडले त्यानंतर डंपर चालकाने गाडी पुढेमागे करून गाडी काढून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु मोटरसायकल खाली अडकल्यामुळे त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून पसार झाला असे दिसते. कासारे फाट्याच्या उत्तरेला विजापूर रस्त्यावर मागच्या पाच दहा वर्षांमध्ये एक नवीन खडीक्रशर टाकण्यात आलेले आहे यांचेच दुसरे खडी क्रशर शीतगृहासमोर आहे जेव्हापासून हे खडी क्रशर चालू झाले तेव्हापासून या रस्त्याने रात्रंदिवस डंपरची बेमालूनपणे आणि भरधाव वाहतूक चालू असते त्यातल्या त्यात डंपरचे चालक कधीही नियमांचे पालन करीत नाहीत आता या आजच्या झालेल्या अपघातावरून असे दिसते की त्यांचा पुढे पन्नास फुटावर डावीकडे टर्न होता तरी डंपर चालकांनी तो टर्न टाळून शॉर्टकट मारण्यासाठी हॉटेल प्रगतीजवळ पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकलस्वारास चिरडले ही गाडी अंतर्गत रोडनी येत असून जेव्हा उभ्या मोटर सायकलस्वारास ड्रायव्हर चिरडतो याचा अर्थ त्या गाडीचा वेग किती असेल याचा आपण अंदाज बांधू शकता. खडी आणि वाळूची वाहतूक करताना वरून ताडपत्रीचे आच्छादन करणे या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत. ताडपत्रीचे आच्छादन न केल्यामुळे एचपीच्या पेट्रोल पंपाजवळील स्पीड ब्रेकर आणि हॉटेल प्रगतीजवळच्या स्पीड ब्रेकरपाशी सतत खडी रस्त्याने पडलेली राहायची. या खडीमुळे अनेक लहान-मोठे अपघात झालेले आहेत. तसेच चष्मा किंवा गॉगल न घालणाऱ्या मोटरसायकल स्वारास जो त्रास होता तो वेगळाच. याबाबतीत तहसीलदारांना आजपर्यंत अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या असूनही या गोष्टीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. साक्री ते पिंपळनेर मध्ये नवीन रस्त्याचे काम चालू असून अशा अपघातसंभाव्य खेड्यांमधून मुख्य रस्त्याला गावातून फाट्यावर येणारे जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांना अंतर्गत बाजूला सगळीकडे स्पीड ब्रेकर देण्याची नितांत आवश्यकता आहे. साक्री पिंपळनेर रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे त्यांनी सुद्धा जेवढे गावं आहेत, त्यांच्या फाट्यामध्ये अंतर्गत बाजूला १०० मीटरपर्यंत नवीन रस्ता करून द्यायचा असा शासनाचा नियम आहे. रस्त्याचे काम पूर्णत्वास आले तरीही या ठेकेदाराने आजपर्यंत कुठल्याही फाट्यावर अशा प्रकारचा रस्ता बनवलेला नाही, फक्त मुरूम टाकून मोकळे झालेले आहेत यामुळे रोजच्या गाड्या स्लीप होणे आणि अपघात होणे या गोष्टी आता नित्यनेमाच्याच झालेल्या आहेत. आता तरी रस्त्याच्या इंजिनिअर यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन लोकांचे प्राण वाचवावेत अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.













