सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १० लाखांची फसवणूक; फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
फलटण प्रतिनिधी : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक हणमंत गावडे (वय २४) राहणार जावली तालुका फलटण या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ दरम्यान आरोपी रामकिसन गंगाधर ध्यार (रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) व डॉ. भगवान अंतू पवार (राहणार माहीत नाही) यांनी फिर्यादीस आपण डी.एम.ई.आर. (DMER) अंतर्गत फार्मासिस्ट पदावर सरकारी नोकरी लावून देऊ, असे सांगून विश्वासात घेतले.
सरकारी नोकरी मिळेल या आशेने फिर्यादीने आरोपींच्या सांगण्यावरून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १० ऑक्टोबर २५ ते आजअखेर एकूण १० लाख रुपये आरोपींकडे वर्ग केले. मात्र, रक्कम घेतल्यानंतरही फिर्यादीस सरकारी नोकरी मिळाली नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी १६ जानेवारी २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती व डिजिटल पुरावे तपासण्यावर पोलिसांचा भर आहे.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, तसेच कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित जाहिरात, भरती प्रक्रिया व अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिस करीत आहेत.













