नाष्टा सेंटरवर एकटी असताना महिलेचे १ लाख १० हजार रुपयांचे दागिने हिसकावले; फरांदवाडीत जबरी चोरी
फलटण : फरांदवाडी (ता. फलटण) येथे शिवराही नर्सरीजवळील स्वामी अमृततुल्य चहा व वडापाव नाष्टा सेंटरमध्ये एकटी महिला व्यवसाय करीत असताना दोन अज्ञात इसमांनी तिचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री दत्तात्रय नाळे (वय ४०, व्यवसाय – स्वामी अमृततुल्य चहा व वडापाव नाष्टा सेंटर, रा. शिवराही नर्सरी शेजारी, फरांदवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांचे गेल्या दोन महिन्यांपासून फरांदवाडी येथील शिवराही नर्सरीजवळ त्यांचे स्वामी अमृततुल्य नावाचे चहा व नाष्ट्याचे हॉटेल आहे.
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी तेजश्री नाळे एकट्याच हॉटेलवर होत्या.रात्री सुमारे ८ वाजता दोन अज्ञात इसम दुचाकीवर डबलसीट येऊन हॉटेलसमोर थांबले. त्यापैकी एकाने “१० वडापाव पाहिजेत” अशी ऑर्डर दिली. फिर्यादी वडापाव तयार करण्यासाठी मागे वळून हॉटेलमध्ये काम करत असतानाच, त्या दोघांनी अचानक २६ हजार ८०० रुपये किंमतीचे काळ्या मन्यामध्ये ओवलेले लहान मणी मंगळसूत्र व ८३ हजार ७५० रुपये किंमतीचे दोन्ही कानातील वेल व झुमके असा एकूण १ लाख १० हजार ५५० रुपये किंमतीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.या झटापटीत फिर्यादीच्या डाव्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी तात्काळ दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी फलटण पोलिस पुढील तपास करीत असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.













