आठ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी ):- विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. लोणजे ता. चाळीसगाव येथील विवाहितेने २०१७ साली शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भादंवि कलम ४९८ (अ) व ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील संशयित निलय प्यारेलाल कडेल हा तक्रार दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी शोध घेत असूनही तो सापडत नव्हता. दरम्यान, संशयित मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो लोणजे येथे आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास चव्हाण व संदीप माने यांनी लोणजे येथे सापळा रचून या फरार असलेल्या आरोपी कडेलला अटक केली आहे.










