खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर आमदारांच्या मध्यस्थीने अखेर गुन्हा दाखल
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव )
चाळीसगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तडजोडीनंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने एक लाख वीस हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
खंडणी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.
संबंधित तरुणाने यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे गाठले. यावेळी आमदारांनी तक्रारदार तरुणाशी पोलिस अधिकाऱ्यांसमोरच संवाद साधला. त्यावेळी संबंधित तरुणाने पैशांची मागणी झाल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करून खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. यासाठी आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव पोलिस ठाण्यात जवळपास तीन तास ठिय्या मांडुन होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले, आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा, त्याला अटक
करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही ? असा प्रश्नही आमदार चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला.













