राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने राहुल सोलापूरकर यांचा प्रतिकात्मक वध
सोलापूरकर यांच्यावर मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्याची गरज : सरदार भोगांवकर
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत अवमानकारक विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज दि. 9 रोजी शिवतीर्थावर त्यांचा प्रतिकात्मक वध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत अवमानकारक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सातार्यासह राज्यभर सोलापूरकर यांच्याविरोधात जनप्रक्षोभ उफाळून आला. या विधानाविरोधात सर्वसामान्यही रस्त्यावर उतरला. सोलापूरकर यांच्या विधानाचे पडसाद सातारा शहरातही उमटले.
रविवार दि. 9 रोजी सातारा येथील शिवतीर्थावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार भोगांवकर यांच्यासह त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवतीर्थावर जमले. तेथे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेचा शिवकन्या साईलिला बोधे यांच्या हस्ते प्रतिकात्मक वध करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन झाल्यानंतर उपस्थितांनी सोलापूरकर यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष माधव लोहार म्हणाले, ज्या छत्रपतींच्या कार्यकाळात जातीपातीचे राजकारण कधीच आडवे आले नाही, ज्यांनी सर्व जातीधर्माला एक न्यायाने वागवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपतींबाबत अवमानकारक विधान केले. त्यांच्यावर याबाबत फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार भोगांवकर म्हणाले, छत्रपती शिवराय हे आमच्यासह संपूर्ण हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेले विधान हे निंदनीय आहे. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांच्या विधानामुळे वाटत आहे. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलण्यास राष्ट्रवादी मदत कक्ष कधीही तयार आहे. पुन्हा जर सोलापूरकर यांनी अशाप्रकारची गरळ ओकली, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा काय होता, त्याचे दर्शन घडविण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादीचे सातारा तालुकाध्यक्ष शशिकांत वायकर, सयाजी पाटील, संदीप भोसले, संदीप माने, सनी काटे, अमित खंदारे, सीमा जाधव, अतुल भोसले, मनिष लाहोटी, सुशील इंगवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.













