लायन्स क्लब ऑफ फलटणची पाचवी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
आर्थिक व्यवहारांचा आढावा, सामाजिक उपक्रमांचे नियोजन आणि माळजाई मंदिर परिसरातील विकासकामांवर महत्त्वपूर्ण चर्चा
फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणची पाचवी सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता माळजाई मंदिर येथील लायन्स हॉलमध्ये खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेमध्ये क्लबच्या मागील महिन्यातील आर्थिक व्यवहारांचा आढावा, आगामी सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे नियोजन तसेच लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेच्या प्रारंभी क्लबचे सचिव लायन प्रमोद निंबाळकर यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर क्लबचे खजिनदार लायन दिलीप शिंदे यांनी ऑक्टोबर महिन्यापासून १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या आर्थिक व्यवहारांचा सविस्तर जमा-खर्च व ताळेबंद सभेपुढे मांडला.
क्लबचे चेअरमन लायन रणजीत बर्गे यांनी डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक एड्स प्रतिबंध दिन, ॲडव्होकेट डे तसेच विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रमांच्या नियोजनाची माहिती दिली. आगामी महिन्यातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ओपन जिम प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी ओपन जिम प्रकल्पाबाबत चेअरमन लायन प्रमोद निंबाळकर यांनी सविस्तर माहिती दिली. हा प्रकल्प येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी कोण असावेत, याबाबत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रस्तावास सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले.
कमिन्स इंडियाच्या सहकार्याने नाना-नानी पार्क विकसित करण्याचा मानस
माळजाई मंदिर परिसरात कमिन्स इंडिया कंपनीच्या सहकार्याने प्रस्तावित असलेल्या ‘नाना-नानी पार्क’ प्रकल्पासाठी लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माळजाई मंदिराच्या दर्शनी भागात संपूर्ण संरक्षित भिंत उभारण्याच्या प्रस्तावाची माहिती लायन प्रमोद निंबाळकर यांनी सभेत दिली.
अद्ययावत लायन्स अभ्यासिका उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मान्यता
सभेमध्ये अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयात माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी अद्ययावत लायन्स अभ्यासिका उभारण्याबाबत चर्चा झाली. यासाठी रहिमतपूर येथील हिंद वाचनालय व अभ्यासिकेला फलटण लायन्स क्लबचे PST पदाधिकारी व सदस्य यांनी सामूहिक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करावी आणि त्यानंतर फलटणमधील अभ्यासिकेच्या उभारणीचे पुढील नियोजन करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मान्यवरांचा सन्मान
यावेळी फलटण लायन्स क्लबचे कॅबिनेट सदस्य लायन संजय दाते यांनी क्लबच्या रिपोर्टिंग कामकाजासाठी उच्च दर्जाची संगणक यंत्रणा तसेच स्पीकर आणि कॉर्डलेस माईक सेट भेट दिल्याबद्दल त्यांचा क्लबचे चेअरमन लायन रणजीत बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच फलटण लायन्स क्लबच्या PST पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी माजी प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी लायन सुरेश भोंगळे यांच्या प्रस्तावानुसार सर्व PST पदाधिकाऱ्यांना बुके देऊन अभिनंदन केले.
दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ निमित्त स्नेहमेळाव्याची संकल्पना देणारे दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल क्लबचे माजी चेअरमन लायन महेश साळुंखे यांचा लायन रणजीत बर्गे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या सभेला लायन्स क्लब ऑफ फलटणचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्यांनी केलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील सकारात्मक चर्चेमुळे सभेचे कामकाज यशस्वीरीत्या पार पडले.
क्लबच्या आगामी सामाजिक वाटचालीला दिशा देणारी ही सभा ठरली असून, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाच्या माध्यमातून फलटण शहराच्या सामाजिक व नागरी विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेच्या शेवटी क्लबचे खजिनदार लायन दिलीप शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.













