प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचा पुढाकार! नायब तहसीलदारांकडे निवेदन
चाळीसगाव, प्रतिनिधी रणधीर जाधव :-
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण व्हावे, वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण राहावे आणि नागरिकांनी सुरक्षित व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन, ओढरे यांच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी फटाक्यांच्या अतिवापरामुळे होणारे वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण यांचा परिणाम मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशू-पक्ष्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. निवेदनाद्वारे नागरिकांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, ध्वनी व वायुप्रदूषणासंबंधी लागू असलेल्या नियमांचे पालन व्हावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ‘प्रदूषणमुक्त दिवाळी ही केवळ संकल्पना नसून पर्यावरणाप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,’ या भावनेतून संस्थेच्या वतीने नागरिकांनी फटाक्यांचा अनावश्यक वापर टाळावा, परिसर स्वच्छ ठेवावा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड, उपाध्यक्ष आरती महाले यांच्यासह उज्ज्वला कोठारे, कीर्ती देशमुख, आकाश राठोड, श्रीराम राठोड, भारती राठोड आणि राहुल राठोड यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.












