पायदळ जनावरे हाकणाऱ्यांवर कारवाई; मात्र चारचाकीतून होणाऱ्या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष?
कोरपणा, प्रतिनिधी : कोरपणा तालुक्यात कत्तलीच्या उद्देशाने जनावरे पायदळ हाकून नेणाऱ्यांवर पोलीसांकडून सातत्याने कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे चारचाकी वाहनांमध्ये जनावरांना अमानुषपणे कोंबून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील विविध मार्गांवरून पिकअप, बोलेरो आणि इतर चारचाकी वाहनांमधून जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. या वाहनांमध्ये जनावरांना अत्यंत क्रूरपणे कोंबून नेले जात असल्याचे आरोप होत असतानाही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
पायदळ जनावरे हाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत असेल, तर चारचाकी वाहनांमधून अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही समान निकषांनुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून होत आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाने अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













