चाळीसगावतील दूध भेसळ व अवैध वाळू वाहतुकीबाबत तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

चाळीसगावतील दूध भेसळ व अवैध वाळू वाहतुकीबाबत तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव शहर व तालुक्यात दूध, तूप, खवा, पनीर, पेढे तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांमधील संभाव्य भेसळीविरोधात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याबरोबरच भडगावकडून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मा. अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व मा. तहसीलदार, चाळीसगाव यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चाळीसगावची ओळख “दुधाचे आगार” म्हणून असून दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे दूध संकलन केंद्रे, डेअरी, मिठाई दुकाने, खवा-पनीर विक्रेते तसेच खाद्यतेल विक्रेत्यांची व्यापक तपासणी करून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

दरम्यान, दुसऱ्या निवेदनात भडगावकडून चाळीसगाव शहराच्या दिशेने सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डंपर व इतर वाहनांद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारावर तातडीने अंकुश आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासाठी खरजई नाका व नागद चौफुली परिसरात रात्रीचे बैठे गस्ती पथक तैनात करण्यात यावे, तसेच संबंधित ठिकाणी बॅरिकेडिंग उभारून संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अवैध वाळू वाहतुकीत सहभागी असलेल्या वाहनांवर आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. सदरचे निवेदन मराठा सेवा संघाच्यावतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, डॉ. अजय पाटील, समाधान पाटील, दिनेश पाटील, गोरख साळुंखे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दिन शेख, चेतन देशमुख, किशोर जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी आदींच्या वतीने देण्यात आले.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. “नागरिकांचे आरोग्य आणि नैसर्गिक संपत्ती या दोन्हींचे संरक्षण करण्यासाठी भेसळखोर व अवैध वाळू माफियांविरोधात प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करावी,” अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें