हिंगणगाव येथे दुर्दैवी घटना; कॅनलच्या सिमेंट पाइपमध्ये अडकून तीन मुलांचा मृत्यू
फलटण प्रतिनिधी / शिवाजी भोसले
फलटण दि. १३ : सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव परिसरात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगणगाव येथील खानविलकर बंगल्या शेजारी असलेल्या कॅनलच्या पाण्याच्या सिमेंट पाइपमध्ये अडकून पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले खेळत असताना कॅनलमधील सिमेंट पाइपमध्ये गेली असावीत. मात्र पाइपमध्ये पाणी असल्यामुळे आणि बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यामुळे ती आत अडकली. बराच वेळ मुले दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून या दुर्घटनेमुळे हिंगणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.









