रणजितदादा हेच फलटणचे पालकमंत्री – जयकुमार गोरे

रणजितदादा हेच फलटणचे पालकमंत्री – जयकुमार गोरे

फलटण प्रतिनिधी : “फलटणमध्ये कोणीही येऊ द्या, कोणताही पालकमंत्री येऊ द्या; पण मी ठामपणे सांगतो की फलटणचे खरे पालकमंत्री रणजितदादा निंबाळकरच आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः उभे आहेत,” असा ठाम दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशाबद्दल रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना गोरे बोलत होते. फलटण येथील सजाई गार्डन येथे आयोजित विजयी मेळाव्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

गोरे म्हणाले, “मी फलटणला आलो की काही लोक हेटाळणी करायचे—‘वरचा आलाय, खालचा आलाय’ असे म्हणत. पण काळाचा महिमा पाहा, आज फलटणच्या प्रथम नागरिकांनीच माझे स्वागत केले आहे. फलटणच्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात आमदार सचिन पाटील यांच्या विजयाने झाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांनी पालिकेवर विजयाचा झेंडा फडकवून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फलटण नगरपालिकेतील पराभव म्हणजे विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाचा शेवट आहे.”

विरोधकांवर हल्लाबोल करताना गोरे पुढे म्हणाले, “फलटणमधील पराभवाची धास्ती घेत जिल्ह्यातील काही नेते दोन-चार दिवसांपासून आघाडी करण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. ज्यांनी राज्यातील महानगरपालिकांचे निकाल पाहिले आहेत, ते असे धाडस करणार नाहीत. फलटणच्या राजकीय परिवर्तनाचा पहिला आणि दुसरा टप्पा आपण पाहिला आहे. येणारी निवडणूक हा परिवर्तनाचा अंतिम टप्पा असेल.”

ते पुढे म्हणाले, “लबाड बोलून बोलून विरोधकांची दाढी पांढरी झाली आहे. आता ते आणखी किती लबाड बोलणार? चौधरवाडी शाळेच्या इमारतीसाठी रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रयत्न केले आणि त्या कामासाठी निधी आम्ही दिला. लबाडीच्या पायावर उभे असलेले राजकारण फार काळ टिकत नाही.”

राजकीय रूपक वापरत गोरे म्हणाले, “जंगलात वाघ येतो तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करतात. उद्या कोणीही आघाडी करा, कोणी कुठेही जाऊ द्या. संघटन मोठे होत असते. सुकाळ आला की इच्छुकांची संख्या वाढते.”

यावेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, बापूराव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें