फळपिकांना खत देण्यासाठी ‘रिंग पद्धतीचे’ कृषिदूतांकडून प्रशिक्षण
फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५ – २६ कार्यक्रमाअंतर्गत फळपिकांना मातीद्वारे खते देण्याचे प्रात्यक्षिक घेतले व शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.
हे प्रात्यक्षिक जग्गनाथ बनकर यांच्या डाळिंब बागेमध्ये करून दाखवण्यात आले. कृषीदुतांनी सुरुवातीला या प्रात्यक्षिकास लागणारी खते जसे की, युरिया (नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद), म्यूरेट ऑफ पोटॅश (पालाश) यातील रासायनिक घटक यांची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यांनी ही खते पिकाला देण्याची शास्त्रीय पद्धत शेतकऱ्यांना सविस्तररित्या सांगितली.
या रासायनिक खतांसोबत त्यांनी शेणखताचाही वापर केला.यांनी डाळिंब फलोत्पादनासाठी लागणारा एन.पी.के. (३१२ ग्राम नत्र, २५० ग्राम स्फुरद, २५० ग्राम पालाश + १० किलो शेणखत) प्रती झाड प्रती वर्ष (पाच वर्ष वयाच्या झाडांसाठी) हा डोस ही शेतकऱ्यांना सांगितला. तसेच ही खते वापरण्याचे फायदे जसे की, नत्र हे पानातील हरितद्रव्यांचा महत्त्वाचा घटक असून ते झाडाच्या प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. तसेच स्फुरद हे मुळांचे चांगल्या वाढीसाठी व पालाश हे फळाची निरोगी वाढ, फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले. या उपक्रमास शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर , कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितीशा पंडित तसेच प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत तुषार अभंग, अनुप बनकर, अजय बिचुकले, अथर्व डाके, ऋषिकेश जाधव, संग्राम जगताप व साहिल बनसोडे यांनी हा उपक्रम पार पडला.













