पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचा निर्णय योग्य; नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज
फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय काही आडमुठ्या लोकांकडून धरला जात आहे, तरी अनेक नागरिक, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. उपलब्ध जलसाठा मर्यादित असताना सर्व भागांना समान आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरील ताण वाढला आहे. उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्यासाठी आणि भविष्यात अधिक गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दररोज पाणीपुरवठा करण्यापेक्षा एक दिवसाआड पाणी देणे हा अधिक व्यवहार्य पर्याय असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
काहीच्या मते बांधकामे, वाहन धुण्याची केंद्रे आणि स्विमिंग पूल यांच्यावर निर्बंध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी या ठिकाणी वापरले जाणारे पाणी आणि घरगुती पिण्याच्या पाण्याचा स्रोत अनेकदा वेगळा असतो. काही बांधकाम प्रकल्प टँकरद्वारे किंवा पर्यायी स्रोतांमधून पाणी घेत असल्याने त्याचा नगर परिषदेच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होत नाही, असे जाणकारांचे मत आहे.
याशिवाय, दररोज अल्प कालावधीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या मागणीवरही काही नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, शहरातील सर्व भागांमध्ये समान दाबाने पाणी पोहोचवणे आणि वितरणाचे व्यवस्थापन करणे हे एक दिवसाआड पुरेशा कालावधीसाठी पाणी देण्याच्या पद्धतीत अधिक सुलभ होते. त्यामुळे नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याची संधी मिळते.
काहीजण सध्या अर्धा तास पाण्याची मागणी करत आहेत परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नाही हे त्यांना माहित आहे त्यामुळे पुन्हा अर्धा तास पाणी सोडल्यास पाणी मिळत नसल्याची ओरड याच व्यक्तीकडून होणार असल्याचे दिसून येते त्यामुळे अशा मागणीकडे नगर परिषदेने विरोध करण्याचे मागणी काही जाणकरांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, पाणीटंचाईच्या काळात केवळ प्रशासनावर टीका करण्यापेक्षा नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकू शकतो.
दरम्यान, नगर परिषद प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून पावसाच्या स्थितीनुसार पाणीपुरवठा धोरणात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यातील संभाव्य गंभीर संकट टाळण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
“पाणी ही सामूहिक संपत्ती आहे. संकटाच्या काळात सर्वांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घेतल्यासच परिस्थितीवर प्रभावीपणे मात करता येईल,” असे मत अनेक जागरूक नागरिकांनी व्यक्त केले आहे.












