पाचोरा नगरपालिकेत एकाच प्रभागात विजयी झालेले ब्राम्हणे दांपत्यांचा दिनेश बोरसे मित्र मंडळच्या वतीने सत्कार
(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
पत्रकारांनी एकतर्फी पत्रकारिता न करता संतुलित पत्रकारिता करावी असे प्रतिपादन पाचोरा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रविण ब्राम्हणे यांनी केले. ते चाळीसगांव येथे दिनेश बोरसे मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार दिना निमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळयात बोलत होते. दिनेश बोरसे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे शहरातील हॉटेल ग्रीन लीफ येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या सोहळयात पाचोरा नगरपालिका निवडणूकीत पत्रकार प्रविण ब्राम्हणे व त्यांच्या पत्नी वर्षाताई प्रविण ब्राम्हणे यांचा पाचोरा शहरातील एकाच प्रभाग क्रमांक सातमध्ये विजय झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उमंग परिवाराचे संस्थापिका संपदाताई पाटील, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, आर. डी. चौधरी, नगरसेवक अभिषेक देशमुख, माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे यांनी मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली गेल्या सात वर्षापासून पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करण्यात येत असून पंचायत समितीत त्यांच्या पत्नी स्नेहल दिनेश बोरसे या पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान असतांना सर्वप्रथम शासकीय पातळीवर पत्रकार दिन साजरा करण्यात आल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. याप्रसंगी उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील, जेष्ठ पत्रकार कि सनराव जोर्वेकर, आर.डी. चौधरी तसेच नगरसेवक अभिषेक देशमुख यांनी दिनेश बोरसे मित्रमंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान राखण्यासाठी घेण्याात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकारांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भिंतीवरील घड्याळ व आत्मभान हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नानकर यांनी केले.










