चाळीसगावात वैद्यकीय निष्काळजीपणा? सामान्य सर्दी, ताप, खोकल्याच्या उपचारात बालकाची डायबिटीस तपासणी न केल्याने गंभीर प्रकार; पालकांचा डॉक्टरांना कळकळीचा संदेश
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव:-
शहरातील एका पालकाने आपल्या मुलाच्या उपचारादरम्यान आलेला अत्यंत वेदनादायी अनुभव कथन केला आहे. त्यांच्या मुलाला, गौरव सुरुवातीला सामान्य सर्दी, ताप आणि खोकला होता. उपचारासाठी त्यांनी शहरातील अनेक दवाखाने, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक पालथे घातले. मात्र, दोन ते तीन दिवसांत त्याच्या प्रकृतीत कोणताही सुधारणा दिसून आली नाही.
दुःखद बाब म्हणजे, चाळीसगाव शहरातील एकाही डॉक्टरने गौरवची डायबिटीस (मधुमेह) तपासणी केली नाही. पालकांनी सांगितले की, एका नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तर त्यांना, “मला काहीही समजत नाही, तुम्ही याला धुळे घेऊन जा,” असा सल्ला दिला. अखेरीस, धुळ्यातील चिरंतन हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर गौरव वयाच्या १० व्या वर्षी टाईप १ डायबिटीसने ग्रस्त असल्याचे निदान झाले.
परंतु, दुर्दैवाने, योग्य वेळी निदान न झाल्याने आणि आवश्यक उपचार न मिळाल्याने गौरवचा वयाच्या १६ व्या वर्षी मृत्यू झाला. आपल्या मुलाला शेवटच्या क्षणी जो असह्य त्रास झाला, तो इतर कोणत्याही बालकाला होऊ नये, अशी कळकळीची विनंती पालकांनी चाळीसगाव शहरातील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे केली आहे.
“डॉक्टरांना देव मानले जाते आणि लोक पूर्ण विश्वासाने त्यांच्याकडे येतात. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. लहान मुलांच्या उपचारांमध्ये अधिक काळजी घ्या,” असे भावूक आवाहन पालकांनी केले आहे. “माझ्या गौरववर उपचार करताना चाळीसगाव शहरातील एकाही डॉक्टरने त्याची डायबिटीस तपासली नाही. वेळेवर निदान झाले असते, तर कदाचित आज तो आमच्यासोबत असता. बालकांची योग्य काळजी घेणे आणि वेळीच आवश्यक तपासण्या करणे, हीच माझ्या मुलाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल,” असेही ते म्हणाले.
या हृदयद्रावक घटनेमुळे चाळीसगाव शहरातील वैद्यकीय सेवा आणि बालकांच्या उपचारांबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. सामान्य लक्षणांनंतरही बालकांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास डॉक्टरांनी अधिक सतर्क राहून इतर गंभीर शक्यतांची तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे. पालकांनी केलेल्या या आर्त विनंतीमुळे चाळीसगाव शहरातील डॉक्टर आणि वैद्यकीय संस्था आता या गंभीर विषयावर विचार मंथन करतील आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य पाऊले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













