ऑपरेशन सिंदूरचा साताऱ्यात भाजपातर्फे जल्लोष; महा-आरतीचे आयोजन
सातारा, दि. ७: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्याचा जल्लोष साताऱ्यात भारतीय जनता पक्षातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित दहशतवादी आणि त्यांचे सहकारी मारले गेले. या यशस्वी कारवाईबद्दल पंतप्रधान आणि सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी साताऱ्यातील श्री पंचमुखी गणपती मंदिरात भाजपातर्फे भव्य महा-आरतीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी सैन्यदलाचे मनोबल वाढावे आणि त्यांनी आणखी आक्रमकपणे पाकिस्तानला धडा शिकवावा, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात सातारा विधानसभा प्रमुख अविनाश कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा शहर बाह्य मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, माजी नगरसेवक सुनील काळेकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, बाळासाहेब गोसावी, मनीष महाडवाले, अमोल टंगसाळे, विक्रम बोराटे, दीपक क्षीरसागर, प्रशांत जोशी, चंदन घोडके, विकास बनकर, वैष्णवी कदम, रीना भणगे, अश्विनी हुबळीकर, कल्पना जाधव, गौरी गुरव, चित्रा माने, सोनम काळेकर, कैलास सुतार, शुभंकर चव्हाण, संजय ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
या महा-आरतीद्वारे भाजपाने सैन्याच्या शौर्याला सलाम करत देशभक्तीचा उत्साह संपूर्ण साताऱ्यात पसरवला. उपस्थितांनी “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.









