सोमनाथ वायदंडे चा हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यू पण मृत्यूस जबाबदार कोण?
सातारा; आरोग्य बिगारी असणारा सोमनाथ वायदंडे हा सातारा नगर परिषदेचा कर्मचारी होता.
आरोग्य बिगारी म्हणजे सामान्य पगारामध्ये असाधारण काम करणारा मजूर, त्याचे असाधारण काम म्हणजे तुंबलेल्या सार्वजनिक गटारी ज्यामध्ये सोसायट्यामधील उच्चभ्रू वसाहती मधील मानवीय मलमूत्र त्याच्या लाडक्या पाळीवाचे मलमूत्र अशा अनेक दुर्मिळ बाबींनी तुंबलेले गटार तो साफ करत असतो. तुमचा आमचा परिसर साफ ठेवणारा एक सामान्य कर्मचारी आणि या कचऱ्याकडे तुंबलेल्या गटारी कडे बघून तोंडावर रुमाल ठेवून नाक मुरडणारे आपण, नाममात्र सुरक्षा साधने आणि हे काम त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्याचे तीन तेरा वाजत असतील.
वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी शारीरिक मानसिक आरोग्य ठीक नसतानाही आशा कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा काम करावे लागते. आणि हे वरिष्ठ अधिकाऱ्याला समजत नसेल तर काय म्हणावं लागेल? असाच प्रकार सोमनाथ वायदंडे सोबत घडला आहे. सोमनाथ वायदंडे च्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब पोरके झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण त्याचा मृत्यू अडवणूक करून उपचारास अडथळा निर्माण केल्याने झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सह कर्मचारी मित्र परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूच्या दोन दिवस आधी सोमनाथला त्रास होत होता. त्याच्या छातीमध्ये दुखत होते. आणि उपचार करण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे सुट्टीची विनंती केली. मुकादम आणि आरोग्य विभाग प्रमुख यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे सुट्टी नाकारण्यात आली. दोन दिवसानंतर छातीत दुखण्याचा त्रास वाढल्यानंतर सोमनाथला घरी सोडण्यात आले. दरम्यानच्या काळात सोमनाथचा आकस्मित मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूने प्रशासकीय भोंगळ कारभाराला पुन्हा उघडे केले आहे. आरोग्य बिगारी यांचे हाल आणि कुचेष्टा असे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. मानवाधिकार यांच्यामार्फत आदेशाद्वारे उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्या उपाययोजना राबविण्यात कसूर अथवा टाळाटाळ केल्यास, मानवाधिकार आयोगामार्फत गुन्हा दाखल करण्यात येतो.
असे असताना सुद्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात अमानवीय वागणूक देऊन सुद्धा फार कमी गुन्हे दाखल होतात.
हे दुर्दैव आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी पीडित कुटुंबाला सांत्वन पर भेट दिली नाही हे सुद्धा दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख असल्याने या घटनेची दखल घेणार का? नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे पुत्र आहेत आणि ते वारंवार म्हणत असतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन याचा प्रत्यय सातारकरांना येणार का?









