गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन 👉 मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार. 👉२६ नोव्हेंबर रोजी कामबंद आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार!

गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन
👉 मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार.
👉२६ नोव्हेंबर रोजी कामबंद आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार!
गडचिरोली : ( चक्रधर मेश्राम) दि. १७/११/२०२६ :- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना, गडचिरोली यांच्या वतीने विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या सर्व टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दिनांक ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चात गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले. त्यानंतर सुधारित आंदोलन कार्यक्रमानुसार दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखणी बंद आंदोलन व दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी काम बंद आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आंदोलनाची भूमिका, स्वरूप व पुढील टप्प्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षा विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव तथा अधिसभा सदस्य श्री. सतीश पडोळे आणि अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश सोनुले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष महादेव वासेकर, महासंघ सचिव प्रवीण पहानपटे, सहसचिव शाहीना पठाण, निलेश काळे, अविनाश सिडाम, सुधीर पिंपळशेंडे, माधुरी परसे, कोमल मेश्राम, रामकृष्ण बोरकर, निलेश राठोड, विनायक गेडाम सोबतच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सतीश पडोळे म्हणाले की, पुणे येथील धडक मोर्चादरम्यान मा. संचालक, उच्च शिक्षण, पुणे, डॉ. देवळाणकर यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांशी चर्चा झाल्याचे सांगून, दिवाळीनंतर तातडीने संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न सकारात्मकतेने मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा सन्मान राखून कृती समितीने आंदोलन पाच दिवस पुढे ढकलले; मात्र, अद्यापही संचालक कार्यालयाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद अथवा पुढील कार्यवाही झालेली नसल्याने नाईलाजास्तव समितीने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी होऊन आपल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या द्वारसभेदरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवित, सुधारित आंदोलन कार्यक्रमातील सर्व टप्पे यशस्वी करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी “हम सब एक है!”, “हमारी युनियन हमारी ताकद!”, “कर्मचारी एकजुटीचा विजय असो!” अशा विविध जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.
विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी संघटना एकजुटीने या आंदोलनात सहभागी होणार असून, संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी कटिबद्ध असल्याचा निर्धार या द्वारसभेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?