सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी मतदान! ९७.९२ टक्के मतदारांचा कौल; कोरेगाव, खंडाळा, वाईत शंभर टक्के मतदान
सातारा | १ नोव्हेंबर २०२६
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत तब्बल ९७.९२ टक्के मतदानाची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरळीत पार पडली. निर्धारित वेळेपर्यंत एकूण २ हजार २१ मतदारांपैकी १ हजार ९७९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ हजार ८१८ पुरुष आणि १६१ महिला मतदारांचा समावेश आहे.
कोरेगाव, खंडाळा, वाईत शंभर टक्के मतदान!
तालुकानिहाय मतदानाच्या आकडेवारीत कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांनी शंभर टक्के मतदानाची नोंद केली आहे. पाटण तालुक्यात ९८.९९ टक्के, सातारा तालुक्यात ९८.७३ टक्के, कराडमध्ये ९८.२१ टक्के मतदान झाले. फलटण तालुक्यात २६३ पैकी २५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ९६.१९ टक्के मतदानाची नोंद केली.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी
तालुका मतदान टक्केवारी
सातारा ४६७ / ४७३ ९८.७३%
जावली ६५ / ६९ ९४.२०%
महाबळेश्वर ४६ / ५१ ९०.२०%
कराड ३३० / ३३६ ९८.२१%
पाटण १९७ / १९९ ९८.९९%
कोरेगाव १२७ / १२७ १००%
खटाव १४५ / १५० ९६.६६%
माण ११९ / १२३ ९६.७४%
खंडाळा ८८ / ८८ १००%
वाई १४२ / १४२ १००%
फलटण २५३ / २६३ ९६.१९%
एकूण १९७९ / २०२१ ९७.९२%
आता उत्सुकता निकालाची!
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून विविध राजकीय गटांनी आपापल्या विजयाचे दावे केले आहेत. मतदानाची टक्केवारी मोठी असल्याने मतदारांचा नेमका कल कोणाच्या बाजूने राहिला, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विशेषतः फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे, राजे गटातील संभाव्य मतफूट आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची बाजी याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
९७.९२ टक्के मतदानाचा हा कौल अखेर कोणाच्या सत्तेचा मार्ग मोकळा करणार? जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार? याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
— संपादक विजय भिसे, एव्हीबी माझा













