सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ९६.०९ टक्के मतदान; २,०२१ पैकी १,९४२ मतदारांनी बजावला हक्क!
फलटणमध्ये ९५.८२ टक्के मतदान; कोरेगावमध्ये शंभर टक्के मतदानाची नोंद
सातारा | १ नोव्हेंबर २०२६
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारी ४ वाजेपर्यंतच्या मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण २,०२१ मतदारांपैकी १,९४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी ९६.०९ टक्के इतकी नोंदविण्यात आली.
या मतदानामध्ये १५६ महिला आणि १,७८६ पुरुष मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवरील आकडेवारीत कोरेगाव मतदारसंघाने शंभर टक्के मतदानाची नोंद केली.
मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता कराडमध्ये ९७.९२ टक्के, पाटणमध्ये ९८.४९ टक्के, वाईमध्ये ९९.३० टक्के, खंडाळा येथे ९८.८६ टक्के, तर फलटणमध्ये ९५.८२ टक्के मतदान झाले.
फलटण मतदारसंघात एकूण २६३ मतदारांपैकी २५२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ३४ महिला आणि २१८ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, जावळी मतदारसंघात सर्वात कमी ८२.६१ टक्के मतदानाची नोंद झाली. सातारा येथे ९५.१४ टक्के, महाबळेश्वर येथे ९०.२० टक्के, कोरेगाव येथे १०० टक्के, खटाव येथे ९२.६७ टक्के आणि माण येथे ९५.९३ टक्के मतदान झाले.
एकूणच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९६ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादक : विजय भिसे
एव्हीबी माझा













