फलटण प्रांताधिकाऱ्यांसाठी ५० हजारांची लाच मागणारा खासगी इसम रंगेहाथ जेरबंद
फेरफार रद्द अपीलात बाजूने निकाल मिळवून देण्याचे आमिष; एसीबीची गिरवी चौकात सापळा कारवाई
फलटण | एव्हीबी माझा
फलटण प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासह अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सातारा पथकाने रंगेहाथ पकडले. विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा) असे पकडण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेती व्यवसाय करतात. टाकळवाडे येथील गट क्रमांक १३४, १४० व १४४ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीवर तक्रारदार, त्यांचे आजोबा तसेच अन्य हिस्सेदारांची नावे आहेत. गट क्रमांक १३४ मधील एका हिस्सेदाराने तक्रारदारांची सहहिस्सेदार म्हणून परवानगी न घेता आपल्या हिस्स्याची जमीन विक्री केल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले.
जून २०२६ मध्ये फेरफार क्रमांक २२५७ पाहिल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर तक्रारदारांनी २४ जून २०२६ रोजी सदर फेरफार रद्द करण्यासाठी अपील दाखल केले. फेरफार सन २०२३ मध्ये झालेला असल्याने अपील दाखल करण्याची ६० दिवसांची मुदत संपली होती. त्यामुळे विलंबमाफीचा अर्ज फलटण प्रांताधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार २१ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयात गेले असता त्यांच्या ओळखीचा खासगी एजंट विकास तोडकर याने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी २५ ऑगस्ट रोजी सातारा एसीबीकडे तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौक, फलटण येथे पंचांसमक्ष पडताळणी केली. २७ ऑगस्ट रोजीच्या पडताळणीत विकास तोडकर याने प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी आणि अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसाठी ५० हजार रुपये, तर अपीलाचा निकाल झाल्यानंतर स्वतःसाठी १० हजार रुपये, अशी लाचेची मागणी केल्याचे एसीबीने नमूद केले.
लॉ कॉलेजसमोर सापळा
या पडताळणीच्या आधारे ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौक, फलटण येथील लॉ कॉलेजसमोर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. या कारवाईत विकास शंकर तोडकर यास ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७अ अन्वये फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
या कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथील पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी केले. त्यांना पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.













