चाळीसगावात दोन मंदिरांसह भाविकाच्या घरात चोरी; ६१ हजारांचा ऐवज लंपास
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :–
शहरातील वामननगर, करगाव रोड परिसरातील मारुती मंदिर व महादेव मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. यासोबतच मंदिरातील वस्तूंसह रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अशोक लांडगे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अशोक लांडगे (वय ४२) हे वामननगर परिसरात राहतात. त्यांच्या घराजवळ मारुती मंदिर व महादेव मंदिर असून ते या मंदिरांची देखभाल करतात. २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता मंदिर परिसरातून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ते दर्शनासाठी मंदिरात गेले असता महादेव मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महादेव मंदिरातील पिंडीजवळ ठेवलेला तांब्याचा नाग, तांब्याची घागर व दानपेटी चोरीस गेल्याचे आढळले. तसेच मारुती मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.
चोरट्यांनी तांब्याचा नाग (३ हजार रुपये), तांब्याची घागर (८ हजार रुपये), दानपेटीतील १० हजार रुपये आणि दुसऱ्या दानपेटीतील ४० हजार रुपये, असा एकूण ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी ३० ऑगस्ट रोजी रात्री १ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.












