महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!
फलटण प्रतिनिधी
कमिन्स कंपनीतून गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळून आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनिकेत राजेंद्र भोसले (वय २४, रा. मलटण, ता. फलटण) असे मृत तरुणाचे नाव आहे. मौजे निंभोरे गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला.
महिनाभरापूर्वी झाली होती मिसिंगची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भोसले हा तरुण २८ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणे कमिन्स कंपनीत गेला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याची आई स्वाती राजेंद्र भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता (मिसिंग नं. ६१/२०२६) असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते.
असा लागला मृतदेहाचा शोध
आज, बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास निंभोरे गावच्या हद्दीत, कुटे डेअरीसमोरील लोणंद ते फलटण हायवेच्या उत्तर बाजूला असलेल्या कंपाऊंडच्या आत (गट नंबर ४१५) एका लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कपडे आणि आयडी कार्डवरून ओळख पटली
मृतदेह अनेक दिवस झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने तो पूर्णपणे सडलेल्या (डीकंपोज) स्थितीत होता. पोलिसांनी अनिकेतच्या नातेवाईकांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी अनिकेतचे सावत्र भाऊ मनोजकुमार साहेबराव आढाव यांनी मृतदेहावरील कपडे, बाजूला पडलेले बूट आणि मोबाईलच्या कव्हरमध्ये असलेले आयडी कार्ड (ID Card) पाहून हा मृतदेह अनिकेतचाच असल्याची खात्री पटवली.
पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद
अनिकेतने २८ जुलै ते २ सप्टेंबर या कालावधीत कधीतरी या निर्जन ठिकाणी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची (UD No. 0092/2026) नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.













