फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणी कारवाई
सोमवार, दि. 31/08/2026 | फलटण | एव्हीबी माझा
फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी 30 ऑगस्ट 2026 रोजी निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीनंतर चौकशी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. डॉ. रुपनवर यांनी डॉ. लीला मदने यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावरही हस्तक्षेप आणि त्रासाचे आरोप केले होते. या आरोपांमधील वस्तुस्थिती संबंधित चौकशी व कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.
प्रशासकीय वर्तनाबाबतही गंभीर नोंद
निलंबन आदेशात डॉ. मदने यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील काही गंभीर बाबी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कथित कठोर व असंवेदनशील संवाद तसेच सौजन्यपूर्ण वर्तनाचा अभाव यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4(1)(अ) अन्वये निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
डॉ. रुपनवर यांच्या निधनानंतर प्रकरणाला गंभीर वळण
दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईतील सायन परिसरातील हाय-व्होल्टेज टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
डॉ. रुपनवर यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत डॉ. लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
निलंबन काळात सोलापूर जिल्हा रुग्णालय मुख्यालय
निलंबनाच्या कालावधीत डॉ. लीला मदने यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, सोलापूर निश्चित करण्यात आले आहे. त्यांना फलटण उपजिल्हा रुग्णालयातील विद्यमान पदावरून तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
या संपूर्ण प्रकरणातील आरोप, चौकशीचे निष्कर्ष आणि प्रशासकीय कारवाई याबाबत पुढील काळात अधिकृत कागदपत्रे व चौकशी प्रक्रियेतून वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एव्हीबी माझा
विश्वास आपला, बातमी आपली













