एव्हीबी माझा | विशेष बातमी
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई
दुकानाचा परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाईचा इशारा
फलटण | प्रतिनिधी
आगामी नागपंचमी (७ ऑगस्ट २०२६) सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जात असल्याने नागरिकांच्या तसेच पक्ष्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फलटण नगरपरिषदेने महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
नगरपरिषदेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, चायनीज व नायलॉन मांजा वापरल्यामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पशू-पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, घाऊक विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांनी अशा प्रकारच्या मांज्याची विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
नगरपरिषदेने इशारा देताना म्हटले आहे की, कोणत्याही दुकानात चायनीज किंवा नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फलटणकर नागरिकांनी सुरक्षित पतंगोत्सव साजरा करावा, पर्यावरणपूरक व साध्या सूती दोऱ्याचाच वापर करावा आणि पक्षी व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.













