१२ तासांत दरोड्याचा छडा; १ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आठ आरोपी अटकेत
कवठे येथील महामार्गावरील थरारक दरोड्याचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; कुरिअर पिकअपमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट
सातारा | एव्हीबी माझा
वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर कुरिअर कंपनीच्या पिकअप वाहनाला अडवून सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटल्याच्या प्रकरणाचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत उलगडा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक MH-09-FL-5423) पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी तीन मोटारसायकलींवरून आलेल्या आरोपींनी कवठे गावच्या हद्दीत महामार्गावर पिकअप अडवून चालकाला कोयत्याचा धाक दाखवला. त्याला शिवीगाळ व मारहाण करून वाहनातील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असलेले पोते जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) आणि १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. मालगाव, ता. जि. सातारा येथील काही संशयितांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून दरोड्याच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुरिअर वाहनाच्या वेळापत्रकाची माहिती असल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी गोपीनाथ तानाजी कदम हा कराड येथील कुरिअर कंपनीत काम करत होता. संबंधित पिकअप पुणे आणि कोल्हापूरदरम्यान कधी प्रवास करते, याची त्याला माहिती होती. १६ ऑक्टोबर रोजी पिकअपमध्ये सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती त्याने इतर आरोपींना दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी तीन मोटारसायकलींच्या साहाय्याने पिकअपचा पाठलाग केला. कवठे गावच्या हद्दीत वाहन अडवून दरोडा टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आठ आरोपींना अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणात गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि निषीद शरद साबळे (रा. शिवथर, ता. जि. सातारा) या आठ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असा एकूण १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, भुईंज पोलीस ठाणे, वाठार पोलीस ठाणे तसेच सातारा आणि कराड शहरातील गुन्हे प्रकटीकरण पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.
अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून मोठ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचे अभिनंदन केले.
— एव्हीबी माझा












