फलटण ग्रामीण पोलिसांची गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धडक कारवाई; सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
फलटण | प्रतिनिधी
फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ₹2 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनाळकर यांच्या पथकाने सस्तेवाडी येथे छापा टाकला. यावेळी सुमारे २८० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दोन लोखंडी कढई, काळे-पांढरे रंगाचे ड्रम, गाळपासाठी वापरण्यात येणारे साहित्य, गुळाचे ढेप, तुरटी व जळणाचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, फलटण) याला अटक करण्यात आली असून, कृष्णा उर्फ पप्प्या विश्वास पवार, गणेश मोहिते व रुपेश चव्हाण (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, अशा अवैध धंद्यांबाबत नागरिकांनी गोपनीय माहिती दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनाळकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, अमोल जगदाळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
एव्हीबी माझा | विशेष वृत्त













