खामगांवच्या तरुणांचा संताप; ४ जूनला फलटणमध्ये भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन

साखरवाडी प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील खामगांव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार, आर्थिक गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे शासकीय चौकशीत सिद्ध होऊनही अद्याप दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्याने खामगांव येथील युवक आणि ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि दोषींना तात्काळ गजाआड करण्यासाठी आगामी ४ जून २०२६ रोजी फलटण पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनने रीतसर कायदेशीर परवानगी दिली असून पोलिसांकडे तशी नोंद करण्यात आली आहे.मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर चौकशी; अहवालात भ्रष्टाचार उघड:खामगांव ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार अॅड. अभिजीत प्रमोद चाबुकस्वार व स्थानिक युवकांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणात सुरुवातीला पंचायत समिती अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने ग्रामस्थांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर निर्देश मागितले होते. मा. उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर मा. गटविकास अधिकारी (BDO) पंचायत समिती फलटण यांनी सखोल चौकशी केली आणि दिनांक ३१/१२/२०२५ रोजी आपला अधिकृत चौकशी अहवाल सादर केला. या अहवालात ग्रामपंचायतीमध्ये निधीचा अपहार आणि बनावट दस्तऐवज तयार करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप:BDO चा स्पष्ट चौकशी अहवाल येऊन अनेक महिने उलटले, तरीही संबंधित दोषी व्यक्तींवर कोणतीही फौजदारी कारवाई (FIR) करण्यात आलेली नाही. शासकीय निधी हडप करणाऱ्यांना राजकीय दबावापोटी पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल केले नाहीत, तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.४ जून रोजी फलटण पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन:प्रशासनाच्या या संथ कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवण्याच्या मुख्य मागणीसाठी ४ जून रोजी खामगांवचे ग्रामस्थ संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे रीतसर निवेदन पंचायत समिती फलटण , फलटण शहर पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आली आहे.या आंदोलनात अॅड. अभिजीत चाबुकस्वार, आशिष बनसोडे, तेजस जावकर, हर्षद भगत, रविकांत गायकवाड, युवराज माने यांच्यासह गावातील युवक, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जर ४ जून रोजी ठोस कारवाई झाली नाही, तर यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.












