फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा -25 मार्च 2026 ,
46 महत्त्वाच्या विकास विषयांवर चर्चा; शहराच्या प्रगतीला नवा वेग मिळण्याची शक्यता
फलटण : फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा येत्या २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आली असून, या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित तब्बल ४६ विषयांवर चर्चा व निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अजेंड्यात सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकावर चर्चा, विविध विकासकामांना मंजुरी तसेच नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भातील मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.
शहरातील रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्यान विकास, आरोग्य सुविधा आदी मूलभूत बाबींशी संबंधित विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच विविध प्रलंबित कामांना गती देणे, निकृष्ट कामांवर कारवाई करणे, तसेच नवीन विकासकामांना मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबतच विरोधी असलेल्या राजे गटाने फलटण नगरपरिषद सभागृह व इमारतीच्या नामांतराला विरोध केला आहे त्यामुळे नामांतराचा विषय सुद्धा महत्वाचा ठरणार आहे.
याशिवाय सोलार ऊर्जा वापर, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणी, पार्किंग व्यवस्था, नगरपरिषद कार्यालयातील तांत्रिक सुविधा सुधारणा आदी विषयांचाही समावेश अजेंड्यात करण्यात आला आहे.
फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीत घेतले जाणारे निर्णय आगामी काळातील विकासाचा दिशादर्शक ठरणार आहेत. नगरसेवक, अधिकारी व संबंधित विभागांनी सभेला उपस्थित राहून विषयांवर सखोल चर्चा करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













