आक्षेपार्य विधान करणाऱ्या बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल करा. संभाजी सेनेची मागणी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव): – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बागेश्वर बाबाने अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फिर्यादी होऊन बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छत्रपती संभाजी सेनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी चाळीसगाव तहसीलदार तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना दिले आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवरही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आपण ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्याच महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम बागेश्वर बाबाने भारत दुर्गा मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमात केले आहे, जर तुम्हाला खरोखर महाराजांबद्दल अस्मिता आणि आदर असेल तर तुमच्या उपस्थितीत शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर तात्काळ कारवाई करत स्वतः फिर्यादी व्हावे आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. जर बागेश्वर बाबावर त्वरित कारवाई झाली नाही, तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच भविष्यात बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात कार्यक्रमास बंदी घालण्यात यावी, जर महाराष्ट्रात बागेश्वर बाबाचे कार्यक्रम झाले तर त्याला काळे फासण्यात येईल त्याचा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब लक्ष्मण शिरसाठ, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, उद्योग विकास आघाडी प्रमुख अविनाश काकडे, मीडिया प्रमुख सचिन जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बनकर, किशोर पाटील आदींच्या सह्या आहेत.












