चाळीसगावला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होणार, १५० कोटींची भव्य इमारत व न्यायाधीश निवासस्थानला मंजूरी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
चाळीसगाव तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेत राज्य शासनाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उभारणीसाठी तब्बल १५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. याबाबतची प्रशासकीय मान्यता राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने शासन निर्णय काल प्रसिद्ध केले आहे . बिलाखेड शिवारातील गट क्र. १८८ मधील २.७६ हे.आर. व गट क्र. २७५ मधील ०.४४ हे.आर. अशी एकूण ३.२० हे.आर. एकूण २३,७५०.७६ चौ.मी. बांधकाम क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये १२५.३९ कोटी निधीतून आधुनिक १६ न्यायालय कक्ष, वकील हॉल, प्रशासकीय कार्यालये, पुरेशी पार्किंग व्यवस्था व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालय यांच्या टाईप प्लॅननुसार जिल्हा व तालुका दिवाणी न्यायाधीश यांची निवासस्थाने होणार आहे. ही जागा काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाकडून हस्तांतरित करुन न्यायालयासाठी उपलब्ध केली होती. जागा न्यायालयासाठी उपलब्ध करून देण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंत आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासस्थानांच्या बांधकामामुळे अनेक दशकांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे, जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा भौगोलिक क्षेत्रफळ असलेला चाळीसगाव तालुका जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. सध्या येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालय कार्यरत असले तरी न्यायालयीन कामकाजाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्हा न्यायालयीन कामांसाठी नागरिकांना वारंवार जळगावला जावे लागत असल्याने वेळ व खर्च दोन्हींचा मोठा ताण सहन करावा लागत होता.













