साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलसह १९ वर्षीय तरुणाला मोळाचा ओढा येथे अटक

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलसह १९ वर्षीय तरुणाला मोळाचा ओढा येथे अटक

 ​सातारा प्रतिनिधी- शिवाजी भोसले

सातारा शहरात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका १९ वर्षीय तरुणाला पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शहरात खळबळ माजली आहे.

​सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्रांचा शोध घेण्याच्या दिलेल्या सूचनांनुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना एका संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. शाहूपुरी चौक ते मोळाचा ओढा रस्त्यावरून एक तरुण मोटारसायकलवरून पिस्तुल घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी शाहूपुरी चौकात सापळा रचला. यावेळी माहितीतील वर्णनानुसार एक तरुण मोपेडवरून जात असताना दिसला, मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोळाचा ओढा येथील बबनदा हॉटेलजवळ त्याला ताब्यात घेतले.

​पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही, मात्र अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे मॅगझिन असलेले पिस्तुल आढळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वराज धनंजय अहीरे (वय १९, रा. ७२, महादरे रोड, सातारा) असे आहे. त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. या कारवाईत १ पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण २,१७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन म्हेत्रे, कुमार ढेरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें