फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेशन २०२५’ ला राष्ट्रीय स्तरावर विक्रमी प्रतिसाद
देशातील आठ राज्यांतून ३२०५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग;
दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्याचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन
फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटी (PES) संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण यांच्या वतीने आयोजित ‘इनोव्हेशन २०२५ कॉम्पिटिशन’ चे उद्घाटन नुकतेच संस्थेचे अध्यक्ष व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तांत्रिक कल्पकता आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर विक्रमी प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशभरातून ७०४ टीम्समधील ३२०५ विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
*राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग*
या स्पर्धेत महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांबरोबरच देशातील अन्य सात राज्यांतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कर्नाटक (२६), मध्यप्रदेश(३६), राजस्थान (२०), गोवा (२२), आंध्रप्रदेश (२४), छत्तीसगड (१६) आणि गुजरात (१४) या राज्यांतील विद्यार्थी संघांचा समावेश होता.
*मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती*
या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आय. आय.इ. बी. एम. संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्नल विनोद मारवा सर हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच, गोविंद मिल्कचे सीईओ भल्ला सर आणि श्री दत्त इंडियाचे अजित जगताप यांसारखे स्पर्धेचे प्रायोजक प्रतिनिधीही उपस्थित होते.
सहभागी झालेल्या ३२०५ विद्यार्थ्यांनी आपले अभिनव प्रकल्प आणि संकल्पना सादर करत तांत्रिक ज्ञानाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी बोलताना कर्नल मारवा आणि डॉ. राजवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
*प्रकल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त भेट*
इनोव्हेशन २०२५ कॉम्पिटिशनच्या भव्य प्रकल्प प्रदर्शनाला पाहण्यासाठी जवळपास ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रकल्पांची उच्च गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. फलटण परिसरातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी तसेच आसपासच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही प्रदर्शनाला विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. मान्यवरांनी अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या क्षेत्रात पुढील वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात, असे मत व्यक्त केले.
*कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न*
कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार दळवी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राध्यापक विदुर गुडगे यांनी प्रमुख पाहुणे कर्नल विनोद मारवा तसेच पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी यांची, तर प्रा.शांताराम काळेल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख करून दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आजपर्यंतचा सर्वात मोठी स्पर्धा असुन संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारची स्पर्धा एवढा मोठा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद प्रथमच पाहायला मिळत असल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाचे तसेच महाविद्यालय प्रशासनाचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्रशासनाला, हा अत्यंत यशस्वी झालेला उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावा, असे आवाहन केले.
स्पर्धेच्या ऑर्गनायझींग सेक्रेटरी प्राध्यापिका सौ. धनश्री भोईटे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. प्राध्यापिका सौ. निकिता मुळीक व वेदिका कदम यांनी सूत्रसंचालन केले. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होते.









