मा. मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते तयार करणाऱ्या आरोपीस अटक
मा. आमदार जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच सोलापूरचे पालकमंत्री, यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते तयार करून त्यावर मा. गोरे यांचा फोटो वापरून मेसेंजरद्वारे पैशाची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८६/२०२५ अंतर्गत भा. दं. सं. कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६, ६६(क), ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस ठाणे, यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तांत्रिक पद्धती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून मा. आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते तयार करणारा आरोपी वैभव पोपट पानस्कर (रा. सूर्याचीवाडी, ता. खटाव, मूळ रा. गोपुज, ता. खटाव) याला अटक केली आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तपासादरम्यान, आरोपीने बनावट फेसबूक खात्याद्वारे काही महिला आणि इतर व्यक्तींना मेसेज करून पैसे आणि मोबाइल नंबरची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहे











