स्वयंदिप वुमन संस्था आणि सामाजिक वनीकरण विभाग तर्फे वृक्षारोपण करत पर्यावरण दिन साजरा
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव:-
पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागातर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबवत वृक्षारोपण करून पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेणाऱ्या महिलांचा सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला संकल्प. प्रमुख उपस्थितांमध्ये स्वयंदिप वुमन असोसिएशनच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, सामाजिक वनीकरण विभागाच्या RFO अधिकारी कोमल पिंडकुंडवार, वनपाल, वनमजूर, व स्वयंदिप परिवारातील महिला, यांच्यासह विभागातील अन्य कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करत महिलांनी पुढाकार घेतल्याने हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. RFO अधिकारी पिंडकुंडवार यांनी सांगितले की, फक्त एका दिवसापुरता नव्हे तर वर्षभर वृक्षांची निगा राखली, तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन शक्य होईल. महिलांनी घेतलेला पुढाकार समाजात मोठा बदल घडवू शकतो. यावेळी स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा आणि सदस्यांनी विविध प्रकारच्या झाडांचे रोपण केले. परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि झाडांची निगा राखण्याचे वचन त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण रक्षणाचा शपथविधी पार पडला. स्वयंदिप वुमन असोसिएशनच्या महिलांच्या पुढाकारातून पर्यावरण जपण्याचा एक नवा आदर्श या कार्यक्रमातून उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे.













