सातारा येथे शाहिरी महोत्सवाचे आयोजन शाहिरांच्या डफासोबत घुमणार वीररसाचे पोवाडे

सातारा येथे शाहिरी महोत्सवाचे आयोजन

शाहिरांच्या डफासोबत घुमणार वीररसाचे पोवाडे

 

मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोमवार दि. ९ ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३०वा. शाहू कलामंदिर, सातारा येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री, ॲड. आशिष शेलार यांची आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सातारा जिल्ह्यामध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहिरी व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव येत्या ९ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दिनांक ९ जून, २०२५ रोजी युवा शाहीर प्रदीप सुतार, पुणे यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शाहीरा तृप्ती सावंत, कोल्हापूर व शाहीर आलम पाटवेगार, बागणीकर यांचे सादरीकरण होईल. तसेच सोमवार दि. ९ जून, २०२५ रोजी दु. १२ते ३ वाजे पर्यंत शाहिरी परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादामध्ये शाहीर अंबादास तावरे, शाहीर देवानंद माळी, शाहीर राजू राऊत, शाहीर दादा पासलकर, शाहीर अवधूत विभूते, शाहीरा सीमा पाटील, शाहीरा अनिता खरात यांच्या सहभाग असणार आहे. दि. ९ जून, २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या शाहिरी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

महोत्सवाच्या द्वितीय पुष्पामध्ये मंगळवार दि. १०जून, २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहीर शिवतेज जाधव, जत, शाहीरा अपेक्षा डाके, लातूर व शाहीर संजय जाधव मिनचेकर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवार दि. १२जून, २०२५ रोजी शाहीर अक्षय डांगरे, अहिल्यानगर, शाहीर शुभम भुतकर, सातारा शाहीरा विद्या दिवेकर, कोल्हापूर व शाहीर सुरेशराव सूर्यवंशी, पुणे यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. 

हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी सातारा जिल्ह्यातील रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें