निसर्ग हटवून कोणताही विकास नको – श्रीमंत छ. सौ. दमयंतीराजे भोसले वृक्षतोडविरोधात वाईत कृतज्ञता फेरी; पर्यावरणप्रेमींचा रस्ता रुंदीकरणाला विरोध  

निसर्ग हटवून कोणताही विकास नको – श्रीमंत छ. सौ. दमयंतीराजे भोसले

वृक्षतोडविरोधात वाईत कृतज्ञता फेरी; पर्यावरणप्रेमींचा रस्ता रुंदीकरणाला विरोध  

वाई, दि. २८ एप्रिल २०२५: “निसर्ग नाही तर आम्ही नाही. विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करून कोणताही विकास आम्हाला नको,” असे ठाम मत श्रीमंत छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी व्यक्त केले. सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरणात ब्रिटिशकालीन दोनशे वर्षांहून जुनी शेकडो झाडे तोडली जाणार असल्याच्या विरोधात वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर येथील पर्यावरणप्रेमींनी वाई शहरात कृतज्ञता फेरी काढली. या फेरीचे नेतृत्व दमयंतीराजे भोसले यांनी केले. शेकडो कार्यकर्ते, युवती, महिला आणि नागरिक यात सहभागी झाले होते.

या तिसऱ्या कृतज्ञता फेरीची सांगता वाईतील किसन वीर चौकात झाली. यावेळी बोलताना दमयंतीराजे म्हणाल्या, “ही जुनी झाडे तोडून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. या झाडांवर पक्षी, जीवजंतू आणि आमचा श्वास अवलंबून आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करून नवे रस्ते बनवण्यास आमचा तीव्र विरोध राहील.”  

रस्ता रुंदीकरणामुळे तोडली जाणारी झाडे ही देशी प्रजातीची असून, त्यांच्यावर प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास अवलंबून आहे. झाडे हटवल्यास वातावरण बदल, भूजल पातळीत घट, शेती उत्पादनावर परिणाम आणि स्थानिक छोट्या व्यवसायांना अडचणी निर्माण होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. हा रस्ता महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळाकडे जात असून, याच मार्गावर मोठा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे झाडांचे संवर्धन करूनच रस्त्याचे काम व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या फेरीत नीरज हातेकर, चित्रपट दिग्दर्शक अमीन हाजी, लेखिका ऐश्वर्या रेवडकर, राजेंद्र खरात, भाऊ मेहता, प्रशांत डोंगरे, नागेश मोने, कल्याण पिसाळ यांच्यासह विविध संस्था, तरुण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पर्यावरणप्रेमींनी निसर्गरक्षणासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें