जामा मस्जिदीत गैरप्रकार करणारा तरुणाला चाळीसगाव शहर पोलिसांनी घेतले अखेर ताब्यात
चाळीसगाव प्रतिनिधी :-
चाळीसगाव तालुक्यातील शिवतांडा येथील एका तरुणाने घाट रोड परिसरातील जामा मस्जिदमध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर जाऊन गैरप्रकार केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.मिळालेल्या माहितीनुसार १५ जून रोजी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास संबंधित तरुण मस्जिदमध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी मस्जिदमध्ये नमाज पठण सुरू असताना उपस्थित असलेल्या सलमान खान यांनी त्याच्याकडे लक्ष दिले. आपली ओळख उघड झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने तेथून पळ काढला. मात्र त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या भावाला काही युवकांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने हालचाली करत संबंधित तरुणाचा शोध घेत अवघ्या अर्ध्या तासात त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर घाट रोडवरील जामा मस्जिद येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले. उपस्थितांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मस्जिद ट्रस्टी हाजी गफूर पहलवान, अस्लम मिर्झा, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी उपस्थित नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर जमाव शांततेत पांगला. उशिरापर्यंत संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. घटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पीएसआय संदीप घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायकर, मेहुणबारे पोलीस निरीक्षक दात्रे, पीएसआय कैलास पाटील, गोपनीय शाखेचे भगवान पाटील, एसआयडीचे प्रकाश पाटील तसेच डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात उपस्थित होते.”शहरात शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे,” असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी केले.












