लोकाश्रयावर आधारित ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करणार; ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांची घोषणा

लोकाश्रयावर आधारित ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करणार; ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांची घोषणा

फलटण येथे यशवंतराव चव्हाण यांची ११३ वी जयंती साजरी; ‘मसाप’ आणि ‘महात्मा एज्युकेशन सोसायटी’चा संयुक्त उपक्रम

फलटण प्रतिनिधी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे राजकारणापलीकडे साहित्यामध्ये जे स्थान आहे, त्याचा विचार करता त्यांच्या साहित्य, कला, मराठी भाषा, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांच्या नावाने ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी’ राज्यात यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. शासनाकडे गेली ५-६ वर्षे मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने, आता लोकभावना लक्षात घेऊन लोकाश्रयावर आधारित अशी ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करण्याचा निर्णय आम्ही काही समविचारी मंडळींनी घेतला आहे, अशी घोषणा ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केली.

 

महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा व महात्मा एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीचा कार्यक्रम आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बेडकिहाळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे, ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते प्राचार्य शांताराम आवटे, म. सा. प. शाखा कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. गोविंद वाघ उपस्थित होते.

 

रवींद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले की, १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिला असला, तरी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडे अद्याप अपेक्षित निधी आला नसल्याची अनास्था दिसून येते. ही स्थिती बदलण्यासाठी आणि यशवंतरावांचे नाव साहित्य क्षेत्रात अजरामर ठेवण्यासाठी ही अकादमी कार्यरत होईल. याद्वारे ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील नव्या दमाच्या तरुण साहित्यिकांना प्रोत्साहन व सहकार्य दिले जाईल.

 

यावेळी प्रा. रवींद्र कोकरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील भावपूर्ण प्रसंग सांगून शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरित्राचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. प्रा. गोविंद वाघ म्हणाले की, यशवंतरावांची राजनीती, समाजनीती, सहकार नीती आणि साहित्य नीती पाहता त्यांच्या कार्याची उंची लक्षात येते. साध्या काँग्रेस कार्यकर्त्यापासून देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत त्यांनी मजल मारली, तरीही दिल्लीच्या आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ते उपेक्षितच राहिले. त्यांचे साहित्यिक कार्य पुन्हा नव्याने समाजासमोर आणणे गरजेचे आहे.

 

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणले की, यशवंतरावांचे जन्मगाव देवराष्ट्र येथील स्मारक मोठ्या प्रमाणावर उभे राहायला हवे होते, ते झाले नाही. मात्र, फलटणच्या ‘मसाप’ शाखेने गेली १४ वर्षे त्यांच्या नावाने मराठी साहित्य संमेलन भरवून एक आदर्श निर्माण केला आहे. प्रारंभी, ‘मसाप’ फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. तसेच, महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाखांच्या नूतन फलकाचे अनावरण अरविंद मेहता यांच्या हस्ते झाले.

 

या कार्यक्रमास आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयाच्या अध्यक्षा व मसाप कोषाध्यक्षा सौ. अलका बेडकिहाळ, मुख्याध्यापक भिवा जगताप, मनीष निंबाळकर, सुरेखा सोनवले यांच्यासह मसाप सभासद, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर शेंडे यांनी आभार मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर