एव्हीबी माझा | ब्रेकिंग न्यूज
फलटणमध्ये एफडीएची धडक कारवाई; 37 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
मुंढेच्या दणक्याने फलटणमध्ये गुटखा विक्रीवर कारवाई
फलटण, दि. १८ जून: फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कोळकी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत एका अपार्टमेंटमधून ₹37,965 किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदनिकेवर छापा
सातारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांना कोळकी येथील मोनिता संस्कृती अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक २ मध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १७ जून रोजी रात्री पोलीस व पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
या कारवाईत विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा, तुलसी जर्दा तसेच सुगंधित तंबाखू असा एकूण ₹37,965 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीवर गुन्हा
अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांच्या तक्रारीवरून किरण शशिकांत दोषी (रा. कोळकी, फलटण) याच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित गुटखा उत्पादक कंपन्यांचे मालक व भागीदार यांचाही तपासात समावेश करण्यात आला आहे.
मोक्का कारवाईची चर्चा
राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा व विक्रीवर बंदी असतानाही फलटण परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा अवैध व्यापार सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करून संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.












